ईशान्येकडील ७ पदभ्रमण/ऑफ बीट ठिकाणे...



सौंदर्याने नटलेले, पृथ्वीवरील स्वर्ग जो आपल्याला इथेच भासतो असे ईशान्येकडील ही राज्ये. निसर्गाचे वरदान इथे आपल्याला बघायला मिळते. वेगवेगळे चमत्कार म्हणूनच निसर्ग माणसाला इथे येण्यासाठी साद घालत असतो. बऱ्याचवेळा म्हटले जाते....७ सिस्टर्स (आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, माणिपूर, मिझोराम, माणिपूर, त्रिपुरा आणि १ ब्रदर - सिक्कीम. अर्थात पूर्वांचल च्या सप्त भगिनी आणि 1 भाऊ  

सुरुवात त्या ब्रदर पासूनच करूया.

१. नथु ला पास आणि त्सो ल्हामो लेक सिक्किम.

       जिथे जाण्यासाठी हवामानाची आणि सरकारी यंत्रणेची, त्याचबरोबर शरीराची स्वास्थ्याची परवानगी घ्यावी लागते. याच्या पलीकडे चीन तिबेट ची सीमारेषा. म्हणूनच सोबत आपले सरकारी ओळखपत्र (govt ID) जवळ ठेवावे लागते. सिक्कीम ची राजधानी गंगटोक पासून ५५ किमी वर असलेले हे ठिकाण नथु ला पास आणि ३५ किमी वर त्सो ल्हामो लेक ४३१० मी. उंचीवर असलेले हे नथु ला पास. आजूबाजूला फक्त बर्फाच्या राशी आणि कायम आकाशातून

 भुरभुरणारा बर्फ अंगावर पडत असतो.जसा जसा पुढे जात असतो. सीमेवरील जवानांचे अस्तित्व किती जोखमीचे आहे याची जाणीव होते. बाबा हरभजन सिंग चे मंदिर सुद्धा इथेच आहे. मेल्यावरही माणूस जिवंत असतो आणि तो शत्रुची हालचाल काय चालू आहे ह्यावर नजर ठेवणारे हे बाबा हरभजन यांचे स्मारक. स्वप्ना सारखे  वाटावे इतके नयन मनोहर दृश्य म्हणजे त्सो ल्हामो लेक. गोलगार पसरलेला हा तलाव लांबी १.६० किमी आणि त्याची खोली १६ मी इतकी आहे असे म्हणतात. गगनाला भिडल्याने बर्फाच्छादित पर्वतरांगांनी वेढलेला हा लेक. हिवाळ्यात डिसेंबर - एप्रिल मध्ये हे सरोवर पूर्णपणे गोठते. सिक्कीम मधील सर्व तलावांचा राजा म्हणून याची ओळख आहे.या तलावाला लोक अत्यंत पवित्र मानतात. या भागात प्रदूषण आणि मासेमारी संपूर्णपणे बंदी आहे. खरं तर इथे आल्यावर आपण व्हॅली ऑफ फ्लॉवर्स मध्ये आलो आहोत असे वाटून जाते. ह्रोडोडेड्रोन, पॉपीज, प्रिमुल्या, इरिस अशा असंख्य प्रकारची फुले इथे बघायला मिळतात.




नथु ला पास हा तिबेट - भारत यांच्या सीमेवरील ही जागा.१९६२ साली जे चायना आणि भारत यांच्यामध्ये जे युद्ध झाले ते इथेच. नथु ला पास -  शिळा घालणारी खिंड म्हणजे नो मेन्स लँड मध्ये खंदक कोणी व कसे खोदायचे यावरून झालेला वाद म्हणजे १९६२ चे युद्ध. पण भारतीय सैन्याने केलेला हल्ला आणि आपली सीमा सुरक्षित ठेवली. एक छोटासा चिंचोळा प्रदेश भारताच्या सिक्कीम सरहद्दी मध्ये आहे. लष्करी दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा हा भाग. भारताचा तिरंगा इथे डौलाना फडकताना दिसतो आणि भारतीय सैन्याचे सामर्थ्य सुद्धा. सर्व बाजूंनी बर्फच, मधोमध अमर जवान चे स्मारक.थोडे पुढे गेल्यावर आपली भारताची सीमा दिसते ती काटेरी तार लावलेली. पलीकडे चीनी सैन्य,कधी तरी ते आपल्याशी हस्तांदोलन सुद्धा करतात.

२. झूकू  व्हॅली - दरी - (फुलांची -  पक्ष्यांची साम्राज्य असलेली दरी)

नागालँड - कोहीमा पासून २५ किमी वर असलेली  सुकू  व्हॅली. हाडाच्या ट्रेकर्सचे अगदी ध्येय स्थान. साहस आणि धाडस असेल तरच पदभ्रमण करणाऱ्यांनो माझे पाहुणे म्हणून इथे या आणि सौंदर्याचे रूप डोळ्यात साठवून घ्या असे काहीसे  सुकू  व्हॅली सांगून जाते. ईशान्य भारतातील प्रसिद्ध जाफु डोंगररांगांच्या अगदी नैऋतेला ( दक्षिण - पश्चिम) २४३८ मी.वर सुकू व्हॅली आहे.सृष्टी सौंदर्याने नटलेली ही  व्हॅली . बुटक्या बाबुंची बने इथे दूरवर पसरलेली आहेत. संपूर्णपणे हिरवा बांबू आपल्याला इथे बघायला मिळतो. सूर्योदय आणि सूर्यास्तच्या वेळेला इथे आपल्याला बुलबुल, सुतार आणि हॉर्नबिल पक्षी दिसतात.या व्हॅलीमध्ये ह्रोडोडेड्रोनच्या फुलांचे असंख्य टेकड्या दिसतात.या फुलांचे गालिचे अंथरलेले आहेत असे दृश्य दिसून येते. पांढऱ्या, गुलाबी, लाल,  पिवळे रंगांची फुले आपल्याला आकर्षून घेतात.



        हाडाचा ट्रेकर १ दिवसात परत कोहीमा गाठू शकतो. दरीमध्ये मुक्काम करू शकतो सोबत तंबु असणे आवश्यक आणि खाण्याची सोय आपणच करावी लागते. दरी उतरल्यावर पश्चिम भागात खोनोम व जेलेकी यांच्यामध्ये एका लांबट चिंचोळ्यावर आपण विश्रांतीसाठी थांबू शकतो. आजूबाजूला पाईन वृक्ष आणि सॅच्युरी धबधबा आपल्याला आधार देतात. ट्रेकिंग करताना दक्षता एकच घ्यावी - इथे जळवांचा त्रास होण्याचा संभव असतो.इथे भटकंती करण्यासाठी उत्तम कालावधी म्हणजे जुलै, ऑगस्ट अथवा डिसेंबर - जानेवारी.

३. लिव्हिंग रुट ब्रिज - मेघालय ( ईशान्य भारतातील एक आश्चर्य) 

        चेरापुंजी / सोहरा -- भारतातील सर्वाधिक पाऊस पडण्याचे ठिकाण पण सध्या आपल्याकडेच पाऊस जास्त पडतो. पण भौगोलिदृष्ट्या नावाजलेले ठिकाण चेरापुंजी/सोहरा.या ठिकाणापासून अगदी जवळच एक खेड आहे लैटकिन्स्यु. तिथे रबराची प्रचंड घनदाट जंगले आहेत.सकाळी चेरापुंजी वरून नाश्ता करून निघालो तर दुपारी २-३ वाजेपर्यंत आपण आपल्या रिसॉर्टवर परत येऊ शकतो. साधारणपणे ट्रेकचा कालावधी ५-६ तास. लैटकिन्स्यु खेड्यामध्ये आलो की उजव्या हातात रबराचे घनदाट जंगल खालच्या जंगलाला लागते.थोड अंतर अजून पुढे गेल्यावर आपल्याला जिवंत मुळांच्या पासून बनलेला दिसतो.स्थानिक लोक याचा वापर सहज करतात. पलीकडे सुपारीच्या बागा आहेत. गावाचे नाव उम्नोई. सुमारे २०० - २५० वर्षापूर्वी हे निर्माण झालेले लिविंग रुट ब्रिज. पाऊस अखंड पडत असल्यामुळे जमीन टिकत नाही. बांबु - पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तोटी टिकत नाही म्हणून निसर्गानेच माणसाला वरदान दिले आहे. रबरच्या झाडाच्या मुळांची पकड घट्ट असते म्हणूनच त्याच्या मुळांच्या सहाय्याने बांधले गेलेले हे पुल. ३० वर्ष एकत्रितपणे जर मुळ बांधले गेले असतील तर त्याची पकड एकदम मजबूत होते.

     असाच दुमजली एक पुल उम्शीआड येथे आहे तो बघण्यासाठी १४०० मी.खाली जावे लागते.इथे जाण्यासाठी सोबत पॅकलंच आणि मार्गदर्शक/ वाटाड्या - स्थानिक असावा. उम्सोह फिल पर्यंत स्थानिक वाहनाने येऊ शकतात आणि तिथून पुढे ट्रेक सुरू शकतो.

       अशा प्रकारची सिंगल डेकर ऑर डबल डेकर लिविंग रूट ब्रिज मेघालयात बघायला मिळतात.काही ठिकाणी आपल्याला प्रवेश शुल्क मोजावे लागते.

४. परशुराम कुंड  - अरुणाचल प्रदेश.

        उगवत्या सूर्याची पहिली किरण अंगावर घेणारा प्रदेश म्हणजे अरुणाचल प्रदेश. बर्फाच्छादित शिखरं, बौद्ध धर्म जिथे इतस्तत: पसरला आहे ते ठिकाण. ईशान्येमधील परशुराम कुंड म्हणजे एक पवित्र धार्मिक स्थळ. गुवाहाटी पासून ४५८ किमी वर वसलेले हे ठिकाण. जानेवारी  मकरसक्रांतीच्या कालावधीत पूर्वेकडील कुंभमेळा चा उत्सव साजरा केला जातो. उत्सवाच्या काळात इथे मेळा मार्केट भरते. रस्ता ओलांडून एक नदी वाहत जाते आणि एका चिंचोळ्या भागातून तीव्र वळण घेते आणि एका मोकळ्या जागेवर ती विसावते.मेळा मार्केट मधून कुंडाकडे जाताना ३००-४०० पायऱ्या चढून खाली दरीत उतरायचे . खडकांच्या नैसर्गिक रचनेमुळे इथे कुंड तयार झाले आहे. एकावेळी १५-२० माणसेच उभे राहू शकतात इतकी छोटी ती जागा. भाविक इथे स्थान करतात. रक्त गोठवेल इतके ते थंड पाणी असते.पण श्रध्दाळू भाविकांना स्थान करण्याचा/एक डुबकी मारण्याचा मोह आवरत नाही.


मेळा मार्केट मधून एक किमी. उजव्या हाताला चालत गेले की भगवान परशुरामाचे मंदिर आहे.हे मंदिर विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने बांधले गेले. गाभाऱ्यात १.४ मी. उंचीच्या भगवान परशुरामाची २  मूर्ती आहेत.एक उत्सव मूर्ती आणि एक पूजेची मूर्ती. याशिवाय रेणुकामाता, शिवलिंग व गणेश प्रतिमा सुद्धा आहेत. एक महाकाय घंटा इथे आहे या घंटेची ध्वनीकंपने अनेक प्रती कंपने कानाला खूप आनंद देऊन जातात.

५. रिअक पर्वतरांग - मिझोराम

          ऐझवाल पासून ४० किमी रियक पर्वत रांग आहे.२-३ तासांचा हा ट्रेक. राहण्याची सोय फक्त रिआक टुरिस्ट लॉज मध्ये. संपूर्णपणे जंगलातून हा जाणारा रस्ता.अगदी वरच्या टोकाला गेल्यावर एक विस्तीर्ण पठार उंची १५४८ मी. आजुबाजुला बांबुची झाडे.इथे जंगलात चालत असताना असंख्य पक्षी बघायला मिळतात. पक्षी निरिक्षणlसाठी, वेगवेगळ्या प्रकारची पक्षी बघण्यासाठी अगदी जागा. पॅरेगराईन फाल्कन असा एक दुर्मिळ पक्षी इथे आपल्याला बघायला मिळतो. ट्रेकिंग, रॉक क्लायंविम, झिप लाईन, ऑब्स्टेकल्स, झुमारींग या साहसी खेळांचा खजिना निसर्ग वेड्याना अनुभवता  येईल.१-१.१५ तास चालत राहिल्यावर इथे एक मोठी गुहा समोर येते तिथे विश्रांती घेऊ शकतात आणि त्यापुढे दिसते विस्तिर्ण पठार. मिझोराम एझवाल, आजुबाजुला पर्वतरांग. कढई सारखा दिसणारा भाग - मिझोराम. रिअक ला गेल्यावर फुलांच्या शेताला नक्कीच भेट दया, अँन्थूरियम आणि चिंघेयामम या फुलांची मोठी लागवड इथे केली आहे.

६. मणिपूर - उखरुल आणि खयांग शिखर, सिरोई.

          मणिपूरची राजधानी इंफाल आणि इंफाल पासून ८० किमी अंतरावर मणिपूरचे हील स्टेशन - उखरूल प्रसिद्ध.१२ महिने कधीही इथे येऊ शकतात.तापमान हिवाळ्यात २ते१५-१६ आणि उन्हाळ्यात २०-२५ अंश पर्यंत असते. सभोवताली हिरवेगार डोंगर,थंड हवा, चवदार पाणी यामुळे २ दिवस इथे काढावेत.इथे बघायला बऱ्याच गोष्टी आहेत. विशेष म्हणजे खयांग शिखर आणि त्या सोबतचा २५० मी खाली  खयांग धबधबा इथले आकर्षण.हा मणिपूर मधील सर्वात मोठा धबधबा.सोबत काचाऊफुंग सरोवर - ४ हेक्टर परिसरात पसरले आहे. पदभ्रमण करायचे असेल सिरोईच्या टेकड्या अगदी उखरूल पासून ३८ किमी.वर आहेत.इथे सिरोई शिखराची उंची २४०० मी आहे.या सिरोई टेकड्यामधून बऱ्याच नद्यांचा उगम झाला आहे. निसर्ग भ्रमंती करता करता एक मुक्काम नक्कीच सिरोई टेकड्यांवर करा.एक तंबू ठोका,वाऱ्याचा वेग याचा अंदाज घेऊन अख्खी रात्र इथे काढा. दुसऱ्या दिवशी एकदम ताजेतवाने व्हाल. सकाळचे निसर्ग सौंदर्य उधळण बघुन डोळ्यांचे पारणे फेडेल.

 

         इथे आजुबाजुला तुम्हाला जी फुले दिसतील त्याला सिरोई लिली म्हणून ओळखतात. वेगवेगळ्या रंगातील ही फुले आपल्याला आकर्षित करतात. सिरोई शिखर याला स्थानिक भाषेत " काशिंग " म्हणतात. स्थानिक लोकांचे असे म्हणणे आहे की ही इथली देवता आहे. जी इथल्या राज्याचे रक्षण करते.

    तीन दिवसांचा - उखरुल, खयांग आणि सिरोई शिखर असा ट्रेक करता येईल.

७. त्रिपुरा - उनाकोटी

             कोटी पूर्ण व्हायला एक कमी म्हणून उनाकोटी.अगरताला पासून १७८ किमी वर असलेले उनाकोटी तीर्थ आणि शिल्प. खरं तर हा एक धार्मिक जंगल ट्रेक. आपल्याकडे जशी घळ - शिवघर घळ आहे तशाच प्रकारची ही सुद्धा घळ आहे.या घळीमध्ये दगडाच्या पायऱ्या बांधल्या असून त्या पायऱ्यावरून आपण दरीमध्ये उतरतो. घळीमध्ये एक खळाळता पाण्याचा प्रवाह आहे.४५ मी. उंचीचा अख्खा एक डोंगरच कोरीव काम केलेला आहे.हे सगळे कोरीव काम ७-८ त्या शतकातले आहे. अंदाजे १२०००-१३००० वर्षापूर्वीचे हे सगळे कोरीव काम डोंगराच्या कडेला केलेले भारतातील दुसऱ्या नंबरचे आहे. आजुबाजुला असलेली वनश्री आणि अनेक धबधबे यामुळे या सगळा परिसराला वेगळीच सौंदर्य प्राप्त झाले आहे.

 

या सगळ्या मागची कथा अशी आहे की, भगवान शंकर कैलासावरून काशीला निघाले असता त्यांच्या सोबत सर्व देवदेवता होते. विश्रांतीसाठी इथे थांबले आणि शिवशंकरांनी आदेश दिला सकाळी सू्योदयापूर्वी आपल्याला इथून निघायचे आहे तरी सर्वांनी तयार व्हा. पण भगवान शंकर निघाले तेव्हा कोणीच उठले नाही. शंकरांनी शाप दिला" तुम्ही दगड व्हाल " असे म्हणून भगवान शंकर एकटेच  काशीला निघून गेला आणि ही सर्व शिल्प तयार झाली अशी अख्यायिका आहे.इथे सर्व देव एकत्र असल्याने धार्मिक पवित्र तीर्थ स्थळ याला प्राप्त झाले.

मग कधी जाताय या ऑफ बीट ठिकाणांना भेट द्यायला. 

ईशान्य भारतात भटकण्यासाठी एक नशा हवी, पर्यटनाची नशा तरच सर्व शक्य होत. 

भीती अशी काहीच नाही फक्त इच्छा असावी कारण इच्छा इथे मार्ग.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"PARAM VIR CHAKRA" - English

पर्यटन एक नशा ... ओळख